रविवार, ५ नोव्हेंबर, २०२३

अजी म्या देवाचा गणगोत पहिला...!

 रिक्षावाला खूप आपुलकीचा होता. त्याने सांगितले... काहीच वेळापूर्वी एक माणूस इथे आला होता. एकही कपडा अंगावर नसलेल्या या बाईला बघून, त्याने त्याचा घातलेला पॅन्ट काढला आणि या हिला स्वतः घालून दिला. स्वतःचा नवीन शर्ट काढला आणि तोही घालून दिला. स्वत: मात्र, तो चड्डीवरच आपल्या बाईकने निघून गेला. हे ऐकून अंग शहारले होते.

------
अजी म्या देवाचा गणगोत पहिला...!

अध्यात्मात चमत्काराला नव्हे तर साक्षात्काराला आणि त्याहून अधिक महत्व अनुभूतीला आहे, असे म्हणतात...

 याचा अर्थ, मी काही इथे धर्म-अध्यात्माचे विवेचन वगैरे करणार नाही. माझ्या मते मी सध्या तरी ब्रह्म-कर्माच्या प्रांतात आलेलो नाही आणि आलो असेलही तरी त्या संदर्भातला साक्षात्कार अद्याप झालेला नाही, अनुभूती आलेली नाही. तो आयामातला क्षण असतो, असेही म्हटले जाते.
‘अजी म्या देवाचा गणगोत पहिला...!’ हे जे मतीर्वन लिहिले आहे, त्याचा मथितार्थ म्हणजे मला झालेला भौतिक साक्षात्कार होय.
मी पत्रकारिता क्षेत्रात असल्याने स्वाभाविकच रात्रीचा किडा आहे. एका अर्थाने रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असल्याने, उशिराने घरी जाणे आलेच आणि त्यायोगे रात्री उशिरापर्यंत जागरणही...
बुधवार, १ नोव्हेंबर २०२३ला नेहमीप्रमाणे रात्री १२.३० वाजता मी ऑफिसबाहेर पडलो. सोबत माझे सहकर्मी पत्रकार सुनील चरपे होते. त्यांचे कृषी क्षेत्रातील ज्ञान, चिकित्सा आणि त्यांचे शोधन बघता, मी त्यांना प्रेमाने कृषीगुरुजी अशी हाक मारत असतो. दिवसभराच्या घडामोडींवर चर्चा करत बैद्यनाथ चौकातून ते आपल्या घराकडे वळले आणि मी सरळ आपल्या घराकडील मार्गाने लागलो. अशोक चौक पार करत असताना चौकाच्या मधोमध मला एक पुसटशी प्रतिमा जाणवली. ती प्रतिमा म्हणजे काही सावली, आत्मा किंवा भुताटकी वगैरे नव्हती. ती एक बाई होती. मला ती विवस्त्र जाणवली. परंतु, रात्री घराकडे जाण्याच्या धुंदीत त्याकडे फार असे लक्ष दिले नाही. आणि उत्तररात्री कशाला कुणाच्या भानगडीत पडायचे, ही एक भीतीही होतीच. मी आपला ग्रेट नाग रोडने पुढे निघालो.
अशोक चौक पार करताच, उजव्या हाताला नागोबाचे छोटेसे देऊळ आहे. दहा मिटर अंतरावर दुर्गेचे मंदिर आहे आणि मंदिरावर शिवशंकराचे मोठे चित्र आहे. डाव्या हाताला श्री गजानन महाराजांचे आणि दहा मिटर अंतरावर हनुमंताचे देऊळ आहे. नेहमीप्रमाणे या सर्व देवळातील देवतांना नमस्कार करत आणि नियमित मंत्रजाप करत पुढे निघालो. आणि मन अस्वस्थ झाले. क्षणार्धात विचारांचा हलकल्लोळ उठला आणि चिंतन सुरु झाले. स्वतःला मूर्ख, भित्रट, बोगस आदी सर्व विशेषणे देणे सुरु झाले. अर्धरात्री एक असहाय स्त्री विवस्त्र दिसली असताना, मी त्याकडे कानाडोळा करून, भीती बाळगून पुढे निघालो. त्यावर देवांना नमस्कारही करतो आहे आणि मंत्रजाप करून, मी काय साध्य करतो आहे, असा प्रश्न मला त्यावेळी पडला. शेवटी नमस्कार केलेला हनुमंत आत्ताच अवतरेल आणि सनकन माझ्या थोबाडीत मारेल, असे मला त्यावेळी वाटून गेले. मला मी मनुष्य असल्याची लाज वाटायला लागली आणि मी करत असलेल्या माणुसकीच्या गोष्टी फालतू वाटायला लागल्या.
उत्तररात्र असल्याने आणि हिवाळ्याचेच दिवस असल्याने गारठा जास्त जाणवत होता. मला आठवले आज मी गडबडीत स्वेटर घातली नव्हती. ती माझ्या पिशवीत होती. मी तडक रेशीमबाग चौकातून गाडी वळवली आणि अशोक चौकातील नागोबाच्या देवळाजवळ असलेल्या सिग्नलजवळ उभी केली. विवस्त्र अवस्थेतील ती बाई त्याच जागी उभी होती. मी स्वेटर काढली आणि तिच्या दिशेने चालायला लागलो. तेवढ्यात मागून आवाज आला, दादा टेन्शन नको, आम्ही पण तुमच्या सोबत आहोत. जणू, घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे... असा तो धिर होता. विशेष म्हणजे त्या अर्धरात्री जो आवाज आला तो एका तरुण मुलीचा होता. एक मुलगा आणि त्याच्या मागे दोन मुली, त्या विवस्त्र बाईसाठी काही कपडे घेऊन आले होते.
नंतर मी फक्त बघ्याच्या भूमिकेत होतो. त्या तिघांनी तिला टी-शर्ट घालून दिली. जवळच एक ई-रिक्षावाला होता आणि रात्री समारंभात जेवणाची कामे आटोपून आलेल्या काही ताई-बाई-अक्का होत्या. त्यांनीही आपल्याकडील शाल आणि एक चादर तिच्यावर ओढली.
रिक्षावाला खूप आपुलकीचा होता. त्याने सांगितले... काहीच वेळापूर्वी एक माणूस इथे आला होता. एकही कपडा अंगावर नसलेल्या या बाईला बघून, त्याने त्याचा घातलेला पॅन्ट काढला आणि या हिला स्वतः घालून दिला. स्वतःचा नवीन शर्ट काढला आणि तोही घालून दिला. स्वत: मात्र, तो चड्डीवरच आपल्या बाईकने निघून गेला. हे ऐकून अंग शहारले होते.
त्यानंतर तिला मदत करण्यासाठी बरेच जन पुढे आले. अखेर मीच विचारले, तुझे घर कुठे, तू कोण... तेव्हा तिने तिचे नाव मंगला परसराम चौधरी असे सांगितले. हसनबाग परिसरातील सहकारनगरमध्ये प्लॉट नंबर ३२ असा पत्ता तिने सांगितला. मी सोडून देतो म्हटल्यावर सुरुवातीला आलेले तीघे सांची, साक्षी आणि विनीत यांनी मला तुम्ही एकटे जाऊ नका, आम्ही सोबत येतो म्हणाले. तिचे घर शोधले. परंतु, ते काही सापडले नाही. ती वेडसर होती, हे तेव्हापर्यंत कळून चुकले होते. वाटेत तिने मला तिच्याजवळचे सारेच पैसे देऊ केले. मी हसलो आणि तुलाच मी देतो, असे म्हटले तर ती गप्प झाली. तिच्याशी केलेल्या संभाषणातून तिरळे कुणबी, काळे देव, नवरा, केस दान केले अशा गोष्टी कळल्या. अखेरचा पर्याय म्हणून तिला नंदनवन पोलीस ठाण्यात रात्री १.३० वाजता पोहोचवले आणि पोलिसांच्या सांगण्यानुसार आम्ही घराकडे परतलो.   
तर, अशा तऱ्हेने मला देवाचा गणगोत सापडला. मदत सगळ्यांनाच करायची असते. परंतु, नको त्या भानगडींमुळे कुणी सरसावत नाहीत. एकाने पुढाकार घेतला की सगळ्यांची पाऊले पटापटा येतात. म्हणाल तर तुम्ही केलेल्या चांगल्या कार्याला देवच पाठींबा देतो. माणसात देव असतो ना किंवा माणसात देव शोधावा म्हणतात ना... मग या घटनेत ‘अजी म्या देवाचा गणगोत पहिला...’ असे म्हटले तर काय गैर आहे.

वंदे मातरम

प्रवीण खापरे
..........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा