'गुढी' उभारू 'व्यसनमुक्त' भारताची
वैश्विक विकासाच्या उपक्रमांत आघाडी मिळविण्याची किमया भारतीय तरुणाई साधत असताना, त्याच तरुणाईला एका भयंकर समस्येन्ंो विळखा घातला आहे. तो विळखा व्यसनाधीनतेचा होय! वर्तमानात व्यसनाची परिभाषा नेमकी कशी करायची? असा जर प्रश्न पडत असेल, तर 'अति तिथे माती' हे तीन शब्द पुरेसे ठरावे. प्रारंभी 'जस्ट चिल' म्हणून स्पर्श करावा आणि नंतर 'मस्ट फिल' अशी स्थिती होऊन जावी, त्यालाच 'व्यसन' असे म्हणावे. 'शक्तिवर्धक' तारुण्याला 'भस्मसात' करण्याची अनैतिक व्यूहरचना म्हणजेच 'व्यसन' असे म्हटल्यास वावगे ठरू नये! हाच चक्रव्यूह भेदण्याचा संकल्प या वर्षप्रतिपदेला गुढी उभारून घेऊया...
लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो आणि त्याच लोकसंख्येतील ४0 टक्के जनता ही ३५ वय वर्षांपेक्षा कमी आहे. याचा अर्थ देशातील साधारणत: ६0 कोटी लोकसंख्या ३५ वर्षांहून कमी वयाची आहे. त्यामुळे, जगात भारत हा सर्वाधिक तरुण देश म्हणून ओळखला जातो. आणि म्हणूनच जगाचे नेतृत्त्व करणार्या राष्ट्रांचे लक्ष भारताकडे लागले आहे. किंबहूना, भविष्याचा नेतृत्त्वकर्ता राष्ट्र म्हणूनही भारताकडे बघितले जाऊ लागले आहे. हजारो वष्रे जुनी संस्कृती असलेल्या भारताचा पाया येथील नितिमत्ता आणि संस्कारांनी अधिक सशक्त आणि प्रगल्भ झाला असताना, एका वेगळय़ाच 'व्हायरस'ने त्याला ग्रासण्यास सुरुवात केली आहे. हा 'व्हायरस' व्यसनाचा होय!
या 'व्हायरस'ला प्रतिबंध घालण्यासाठी एका 'अँण्टीव्हायरस'ची गरज आहे आणि तो 'अँण्टीव्हायरस' म्हणून संयमाचा संकल्प होय. तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या आधारावर आज देशातील ५0 टक्के महाविद्यालयीन तरुणाई जी पूर्णपणे आपल्या पालकांवर निर्भर असते, ती विविध व्यसनांच्या आहारी गेली आहे. तर, त्याहून अधिक टक्का 'सेल्फ डिपेंडंट' अर्थात नोकरी किंवा धंदेवाईक तरुणाईचा लागतो, हे विशेष! या व्यसनात सिगारेट, दारू, गुटखा, तंबाखू, खर्रा, व्हाईटनर अशा कित्येक गोष्टींचा समावेश होतो. विशेष म्हणजे, या गोष्टींमध्ये ही तरुणाई त्यांच्या स्व:खर्चाचा किंवा उत्पन्नाचा बराच मोठा भाग खर्ची घालतात, जो निकामी किंवा निर्थक असाच म्हणावा लागेल.
स्पर्धेच्या या काळात वाढत्या खर्चाचा ताळमेळ साधताना कमाईची नवीनवी संसाधने शोधली जात असताना, असला निर्थक खर्च कोणत्या कामाचा? असा प्रश्न न पडणे, हे आपल्या तरुणाईचे दुर्दैवच म्हणावे लागेल. अशा डळमळत्या पायावर भविष्यातील जगाचे नेतृत्त्व कसे काय सोपविले जाऊ शकते? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. एकीकडे आपण विश्वगुरू पदाला पोहोचणार्या राष्ट्राचे प्रतिनिधी म्हणवितो आणि दुसरीकडे डळमळत्या पायावर नेतृत्त्व करण्याचे स्वप्न बघतो. ही परस्पर विरोधी विदारक वास्तविकता मान्य करून, डळमळायला लागलेल्या तरुणाईचे पाय स्वत: तरुणाईने आत्ताच सांभाळणे गरजेचे आहे. अन्यथा, बधिर मनोवृत्तीवर कुणीही सहजरित्या ताबा मिळवू शकतो आणि पुन्हा आपल्यावर वर्चस्व गाजवित आपल्याला 'गुलाम' बनवू शकतो, याचा विचार होणे गरजेचे आहे. याला आपला इतिहास साक्षीदार आहे, त्यामुळे वेगळे सांगणे नको..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा